मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

0 10

राज्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

मुंबई, दि. 4 : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर ते शिर्डी असा प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहनाचे सारथ्य केले. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या 530 किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर येथे येत आहेत.  या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून आज दुपारी आपला प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला. या संपूर्ण दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासमवेत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.

उभय नेत्यांनी दौऱ्यास सुरुवात केल्यानंतर या महामार्गाच्या कार्यकक्षेतील जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचे लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकाऱ्यांनी स्वागत केले. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा हे जिल्हे तसेच मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पाहणी दौऱ्याचे उत्साहात स्वागत झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाल्यानंतर विमानतळ व झिरो पॉईंट येथे भव्य स्वागत झाले. खासदार कृपाल तुमाने यांच्यासह विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री, पोलीस आयुक्त अमितेश कुमार व   इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये विरूळ टोल प्लाझा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन स्वागताला उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नजीक आमदार प्रताप अडसड तर वाशिम जिल्ह्यामध्ये वारंगी येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर व संजय रायमुलकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. बुलडाणा जिल्ह्यातून 89 किमीचा महामार्ग मेहकर, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे.

जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातील 25 गावांतून 42 किलोमीटरचा महामार्ग जात आहे. आज दुपारी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वागत केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातून 54 किलोमीटरचा महामार्ग जातो. जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे आदींनी त्यांचे स्वागत केले.

कोपरगाव इंटरचेंजवर आमदार बबनराव पाचपुते, आमदार आशुतोष काळे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. या दौऱ्याचा समारोप अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे झाला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, सदाशिवराव लोखंडे यांनी येथे त्यांचे स्वागत केले.

00000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.