मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मॉडेल राबविणार- डॉ. तानाजी सावंत – महासंवाद
अमरावती, दि. 3 : मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी कालमर्यादित कार्यक्रम आखून मातामृत्यू, बालमृत्यू दर शुन्यावर आणण्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणण्यात येईल. मेळघाटसाठी आरोग्य सुविधांसाठी आवश्यक सर्व निकषांमध्ये खास बाब म्हणून बदल करण्यात येतील. जेणेकरुन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावेल,असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले.
आरोग्यमंत्र्यांनी गत दोन दिवसांपासून अथकपणे मेळघाटातील आरोग्य केंद्रांना भेटी देऊन यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, सहसंचालक डॉ. माधव कंदेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले की, मेळघाटात कुपोषण निर्मुलनासाठी शासकीय यंत्रणांव्दारे उपाययोजना राबविल्या जातात. तथापि, मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी व्यापक दृष्टीतून नियोजन व अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी खास बाब म्हणून नवे मॉडेल पुढील पंधरा दिवसात निर्माण करण्यात येईल. मेळघाटातील आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका, स्थानिक बांधव या सर्वांशी चर्चा करुन त्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल.
मेळघाटातील दुर्गम भागात संपर्क यंत्रणा व उपचार सुविधा कायमस्वरुपी कार्यान्वित राहणे आवश्यक आहे. मेळघाटातील 21 गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटत असल्यामुळे त्याठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी पाच फुट रुंदीचे एसएस फॅब्रिकेटेड पूलांची निर्मिती करण्यात यावी. संपर्क यंत्रणा कार्यान्वित राहण्यासाठी वॉकीटॉकीचा उपयोग, त्यासाठी वनखात्याच्या टॉवर्सचा वापर व्हावा म्हणून वनखात्याशी समन्वय, नियुक्त डॉक्टर व स्टाफला आवश्यक सुविधा आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात येईल. मॉडेलव्दारे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन रुग्णालये नेटवर्कने जोडून देखरेखीखाली आणणे, संपर्क भक्कम करणे, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ यांची उपलब्धता आदीचाही समावेश असेल. याबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पुढील पंधरवड्यात शासनस्तरावर चर्चा होऊन मॉडेल अंमलात आणले जाईल.
आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील पद भरती पंधरा दिवसात करावी. रुग्णवाहिका वाहनांची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहे व इतर आवश्यक सुविधांत सुधारणा करावी. प्रत्येक केंद्रावर विजेची गरज लक्षात घेऊन 50 केव्हीएचा डिजी सेट असावा. स्टाफसाठी आवश्यक वसतीगृहे असावीत. गरजूंच्या स्थलांतरामुळे आरोग्य योजनांच्या लाभात खंड पडतो, त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. गर्भवती मातांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळण्यासाठी खास बाब म्हणून आवश्यक तरतूद केली जाईल. योजनेच्या अंमलबजावणीबाबत विविध विभागप्रमुखामार्फत थर्ड पार्टी ऑब्झर्वेशन करुन नियमित अहवाल मागविण्यात येईल.
गरजूंनी भूमकाकडे न जाता संस्थात्मक उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. चुकीचे उपचार करणाऱ्या भूमकांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती कार्यान्वित करण्यात येईल. ज्याठिकाणी क्षारयुक्त पाणी आहे तिथे शुध्द पेयजलाबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या संपूर्ण बाबींचा विचार करुन मेळघाट आरोग्य इन्फ्रारेड मॅप तयार करुन मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी परिपूर्ण मॉडेल अंमलात आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बैठकीला विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.