पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करा – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत – महासंवाद
अमरावती, दि. २ : कुपोषणावर मात करण्यासाठी मेळघाटातील दुर्गम भागातील पाड्यापाड्यांवर प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करून गरजूंना आवश्यक सुविधा व उपचार पुरवावेत, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिले.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आज चिखलदरा तालुक्यातील बिहाली, सलोना व आमझरी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास व चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली आणि तेथील कुपोषित बालके, मनुष्यबळ, औषधींचा साठा, गरोदर मातांना पोषण आहार, वैद्यकीय सुविधा उपकरणे आदीबाबत आढावा घेतला.
यावेळी त्यांनी बिहाली येथील रहिवासी मोती कासदेकर यांच्या पाच महिन्याच्या कुपोषित बालकाची पाहणी करून आस्थेने विचारपूस केली.
यावेळी आमदार राजकुमार पटेल, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक श्रीमती डॉ. तरंगतुषार वारे , सहायक संचालक डॉ. कंदेवाड, डॉ. भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तहसीलदार श्रीमती माया माने आदी उपस्थित होते.
०००००