बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
मुंबई, दि. 29 : गोवर संसर्ग आढळणाऱ्या भागात नियमित लसीकरणाबरोबरच अतिरिक्त लसीकरणही केले जावे. बालकांच्या लसीकरणावर भर देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या.
आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, आरोग्य आयुक्त डॉ. तुकाराम मुंढे, महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत यांनी सांगितले की, मुंबई शहरातील ठराविक प्रभागातच गोवरचा संसर्ग आहे. या प्रभागात नियमित लसीकरणाबरोबरच अतिरिक्त लसीकरणही केले जावे. त्यासाठी आवश्यक असणारी लस, मनुष्यबळ यांचे नियोजन करावे.
यावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी एक डिसेंबरपासून नऊ महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे विशेष लसीकरण केले जाणार आहे. यासाठी पथके तयार करण्यात आली असून या वयोगटातील सुमारे एक लाख 34 हजार बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे सांगितले.
मुंबई बरोबरच राज्यातील इतर भागात गोवरच्या संशयित रुग्णांबाबत सतत माहिती घेतली जावी. सर्व महापालिकांमध्ये गोवर प्रतिबंधात्मक विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात यावा. गोवरबाबत आणि लसीकरणाच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
*****
रवींद्र राऊत/विसंअ/