हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल. या टूरची तिकिटे bookmyshow.com वर बुक करता येतील अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉक सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. हेरिटेज चाहत्यांसाठी पहिली हेरिटेज टूर २७ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु करण्यात आला.हा वॉक सकाळी १०, ११ आणि दुपारी १२ वाजून 54 मिनिटांनी करण्यात आला होता.या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त अभ्यासक आणि पर्यटन प्रेमी याचा लाभ घेतील अशी आशा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे आणि त्याची स्थापना १८९९ मध्ये झाली. प्लेगच्या लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिनच्या नावावरून ह्या संस्थेला ‘हाफकिन इन्स्टिटयूट” असे नाव देण्यात आले. सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यामध्ये अग्रेसर असलेली एक बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते. या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने प्लेगसाठी संदर्भ प्रयोगशाळा म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, “या हेरिटेज टूरचा एकमेव उद्देश लोकांना विज्ञान आणि कला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे हा आहे. येथे लोकांना संस्थेच्या वैभवकालीन दिवसाचे दर्शन घडविणरे व्हिटेज फोटो गॅलरी तसेच बॉम्बे गव्हर्नर यांचे निवासस्थान असलेल्या स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट इमारतीचे दर्शन घेता येईल. ह्या संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृति आहेत तसेच प्लेगची लस कशी विकसित झाली ह्याची प्रतिकृति देखील येथे पहायला मिळेल.”