महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपन्नतेचे उदाहरण जगाला दिले जाईल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0 10

मुंबई, दि.२६ : महाराष्ट्राला संपन्न असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या संपन्न अशा वारसाचे जतन आणि जोपासना करून येणाऱ्या काळात अख्या जगामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे उदाहरण दिले जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या दृकश्राव्य केंद्राचे “स्वरालय” दालनात आज उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, दर्शनिका विभागाचे सचिव दिलीप बलसेकर, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहेच. जेथे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्याच महाराष्ट्रात महर्षी वाल्मिकी आणि भगवद्गीता पण आहे. शेक्सपिअर सर्वांना माहीत असतो पण कालिदासही याच भूमीतला आहे. एकूणच हीच महाराष्ट्राची ओळख आपल्याला जगभरात पोचवायची आहे. महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आहे तशीच सांस्कृतिक सुबत्ता आहे. कारण आपल्याकडे असलेली कलेची माध्यमे आपले मन आनंदी ठेवण्याचे काम करतात. आपला हॅपिनेस इंडेक्स वाढविणाऱ्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्व प्रयत्न आपण करू. सांस्कृतिक वारसात महाराष्ट्राचा क्रमांक जगात पहिल्या दहात लागेल इतका समृद्ध वारसा आपल्याकडे आहे, असे ते म्हणाले.

माणसाच्या मनुष्यत्वाला उन्नत व परिपूर्ण करण्याचे कलेचे हे सामर्थ्य आणि त्याबाबतीत महाराष्ट्राचा विश्वविख्यात वारसा व आगळेपणा ध्यानात घेऊन ही कला जतन, संवर्धन व जोपासाण्यासाठी ध्वनिमुद्रित संगीत संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्याच्या दृकश्राव्य कलेचा मोठा वारसा डिजीटल रूपात पुढच्या पिढीला मनोरंजनासोबत अभ्यासासाठीही या दृकश्राव्य केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

श्री. केंद्रे यावेळी म्हणाले की, रवींद्र नाट्य मंदिर येथील वास्तूचा इतक्या कलात्मक पद्धतीने वापर होणार आहे याचा आनंद वाटतो.

दृकश्राव्य दालनाविषयी :

रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे एका दृकश्राव्य दालनाची (Listening Centre) निर्मिती करण्यात आलेली आहे. या दालनामध्ये नाट्य, चित्रपट, लोककला, शास्त्रीय संगीत याविषयीची दुर्मिळ सादरीकरण होणार आहेत. या अभिलेखांमध्ये कॅसेट, ध्वनिमुद्रिका, व्हिडिओ क्लिप्स, पुस्तके, फोटो, भाषणे इत्यादी दुर्मिळ बाबींचा समावेश आहे. हे दालन सर्वसामान्यांसाठी आजपासून खुले होत आहे.

कला ही निसर्गनिर्मित सृष्टीला अधिक रमणीय बनविणारी मानवनिर्मित प्रतिसृष्टी असते. ती मानवाच्या अस्तित्वाला अधिक सुंदर बनविते.त्याच्या अंतर्बाह्य जीवनसत्वाला आविष्कृत करते. माणसा-माणसाला प्रसन्नपणे जोडते आणि समग्र मानवी जीवनाला आनंदमय करते. कोणत्याही कलाक्षेत्रातील कामगिरी हा त्या समाजाच्या नवनिर्माण क्षमप्रज्ञेचा एक अत्यंत महत्त्वाचा मापदंड असतो.

ध्वनिमुद्रित संगीत संग्रहालयामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेले शास्त्रीय संगीतकार्यक्रमाचे दुर्मिळ ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. तसेच चित्रपट महोत्सव, पुरस्कार सोहळे, लोककला महोत्सव, शिबिरे, परिसंवाद या कार्यक्रमांचेही जतन यामार्फत करण्यात आलेले आहे.

विविध ज्येष्ठ कलावंतांच्या मुलाखती जसे की, बाळ कुरतडकर,प्रभाकर जोग, मोहनदास सुखटणकर, सुलोचना लाटकर,भारुडरत्न निरंजन भाकरे, शाहीर देवानंद माळी, भरत कदम (गोंधळ, नृत्यांगना रेश्मा परितेकर, अरुण काकडे, भालचंद्र पेंढारकर, किशोरी आमोणकर, अप्पा वढावकर, प्रभा अत्रे, चित्तरंजन कोल्हटकर, आत्माराम भेंडे इ. मातब्बर कलावंतांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. रानजाई, प्रतिभा आणि प्रतिमा, शब्दापलिकडले इ. मुलाखतींचे कार्यक्रमांचे ध्वनिचित्रमुद्रण दुरदर्शन यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे. श्री.के.टी.देशमुख यांनी संग्रहीत केलेल्या दुर्मिळ नाटकांचे, कलाकारांचे फोटोचे जतन करुन डिजिटल स्वरुपात ठेवण्यात आलेले आहेत. भालचंद्र पेंढारकर यांनी ध्वनिमुद्रित केलेल्या नाटकांचे ध्वनिमुद्रण स्वरालयमध्ये उपलब्ध आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 1985 साली संग्रहित केलेली संगीत व गद्य नाटकांचे ध्वनिचित्रमुद्रण स्वरालयात उपलब्ध आहे. उदा. संगीत मानापमान, संगीत जय जय गौरीशंकर, संगीत पुण्यप्रभाव, संगीत संशय कल्लोळ, संगीत पंडितराज जगन्नाथ, संगीत सुवर्णतुला, संगीत स्वयंवर, संगीत मदनाची मंजिरी, रायगडाला जेव्हा जाग येते (गद्य). महाराष्ट्रातील नऊ विद्यापिठांमार्फत करण्यात आलेल्या लोककला सर्वेक्षणाचे ध्वनिचित्रमुद्रण ‘स्वरालय‘ येथे उपलब्ध आहे.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.