पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0 10

चंद्रपूर, दि. 24 : पाणीपुरवठा योजना हा नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मात्र अनेक ठिकाणी योजना कार्यान्वित करण्यात आल्यावर प्रलंबित विद्युत देयकांमुळे पाणी पुरवठा बंद पडतो. तरी योजना बंद पडू नये व सर्वांना पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यात याव्या, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

नियोजन भवन येथे ग्रामीण पाणी पुरवठा व अमृत पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महानगर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की ‘हर घर जल’ योजनेद्वारे प्रत्येक गावातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोठा संकल्प आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक कुटूंबाला पाणी पुरवठा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वेगाने काम करून लवकरात लवकर नळ योजनेचे काम पूर्ण करावे. पाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या गावांची तालुकानिहाय यादी सर्व ग्रामपंचायतींना पाठवावी व संबंधित ग्रामपंचायतींनी  योजनेचा दर्जा व गुणवत्तेची तपासणी करून घ्यावी.

देशात सगळीकडे पाणी पुरवठा योजनांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे बांधकाम करण्यासाठी कुशल कामगार उपलब्ध होत नसतील तर जिल्ह्यातील युवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देवून त्यांची क्षमता बांधणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे. त्यामुळे पाणी पुरवठ्याची प्रलंबित कामे मार्गी लागतील तसेच स्थानिक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध होईल, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्हा परिषदेद्वारे राबविण्यात येणाऱ्या 32 प्रादेशिक योजनांपैकी टेकाडी येथील योजनेचे विद्युत देयक न भरल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे निदर्शनास आल्यावर नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेने सदर देयकाचा तात्काळ भरणा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच गोंडपिपरी येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्याच्याही सूचना दिल्या. याप्रसंगी पालकमंत्री यांनी पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती, पुढील नियोजन व अडीअडचणी जाणून त्यावर उपाययोजना सूचविल्या.

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सद्यस्थितीत 1304 योजना मंजूर असून त्यापैकी 1302 चे अंदाजपत्रक तयार झाले आहेत. यापैकी 1284 योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. प्रशासकीय मान्यताप्राप्त 850 योजनांना कार्यरंभ आदेश देण्यात आला असून 71 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. सदर 1304 पैकी 344 योजना सौर उर्जेवर घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. बोहरे यांनी दिली.

अमृत योजनेचा आढावा :

चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील प्रलंबित अमृत योजनेशी संबंधीत नळ जोडण्या व रस्ते दुरुस्ती आदीबाबत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेऊन सर्व कामे फेब्रुवारी पुर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत कामासंबंधीत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे. त्यामुळे योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत कंत्राटदराला पूर्ण देयके अदा करू नये. तसेच अमृत योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले शहरातील 120 किलोमीटर रस्ते पालिकेने तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुढे ते म्हणाले, चंद्रपूर शहराला भविष्यात पाण्याची अडचण जाऊ नये, यासाठी इरई नदीवर बंधारा बांधण्याचे नियोजन करावे. महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक विहिरी व बोअरची गणणा करावी. आवश्यक ठिकाणी डागडुजी करून जलस्रोत दुरूस्त करावा. तसेच  पिण्यायोग्य जलस्रोतांवर हिरवा रंग तर पिण्यास अयोग्य असलेल्या जलस्रोतांचा वापर होऊ नये, यासाठी लाल रंग लावण्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक व स्थानिक नागरिकांनी तुकुम, बाबुपेठ, विवेकनगर, बंगाली कॅम्प, शास्रीनगर, भानापेठ, जलनगर, इ. ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत रस्ते खोदून ठेवले पण पाईपलाइन टाकली नसल्याचे तर काही ठिकाणी पाईप लाइन आहे मात्र नळ कनेक्शन दिले नसल्याच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे केल्या. या सर्व तक्रारींचे निवारण महानगरपालिकेने तत्काळ करावे. तसेच संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात महानगर पालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या दुकानांचे भाडे माफ करण्याबाबत कॅबिनेटमध्ये तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. मात्र लॉकडाऊन सोडून इतर कालावधीतील दुकानांचे भाडे संबंधित मालकांनी भरावे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्थानिक नगर पालिका व ग्रामपंचायतींनी त्यांचे उत्पन्नाचे स्रोत असलेल्या विविध करांची 100 टक्के वसुली करून त्यांतून विविध योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करावा. तसेच पाण्याचे नवीन स्रोत कसे वाढविता येतील यावर नियोजन करण्याचे सांगितले.

अमृत योजनेंतर्गत चंद्रपूर शहराकरीता सुरवातीला 50 हजार नळजोडण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात 35 हजार जोडण्या अतिरिक्त वाढविण्यात आल्यामुळे एकूण 85 हजार नळजोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 62 हजार नळ जोडण्या पूर्ण झाल्याची माहिती महानगरपालिका श्री. विपीन पालीवाल यांनी दिली.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, माजी महापौर अंजली घोटेकर, डॉ.मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.