जे.जे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी

0 8

मुंबई, दि. 24 : जे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेवून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मार्गी लावल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

जे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृहासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. नवीन वसतिगृह तयार होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात चर्चगेट परिसरातील मातोश्री या वसतिगृहात व्यवस्था करावी. मुलींसाठी अंधेरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिथी गृह भाडेतत्वावर घेण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिले.

जे जे कला महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याच्या प्रतिक्षेत विद्यार्थी आहेत. वसतिगृहाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

एमपीएससीमार्फतच प्राध्यापकांची भरती

कला महाविद्यालयातील प्राध्यापक हंगामी तत्वावर कार्यरत होते. या हंगामी प्राध्यापकांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही केली जात आहे. तथापि विविध महाविद्यालयांतील १६९ प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच भरली जाणार असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात मंत्री श्री. पाटील यांनी एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन प्राध्यापक भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जारी करण्यास सांगितले.

कला महाविद्यालयातील सोयीसुविधांबाबत विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांवर मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाविद्यालयांतील सोयीसुविधांसाठी राज्य शासनाकडे निधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची यादी तयार करावी. त्यात विद्यार्थ्यांच्या सूचनांचा देखील समावेश करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. या निधीचा योग्यप्रकारे वापर करण्याच्या सूचना देखील श्री. पाटील यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, उप अभियंता, जे जे कला महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००

पवन राठोड/ससं/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.