मराठी भाषा उपकेंद्राचे लवकरच होणार भूमिपूजन – उद्योगमंत्री उदय सामंत

0 13

मुंबई दि. 24 : चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली येथील उपकेंद्राचे भूमिपूजनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मराठी भाषा भवन उभारणीसंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले की, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करुन या मराठी भाषा भवनाच्या उभारणीत उद्योग विभागाने तत्परता दाखवावी. तसेच उपकेंद्राच्या भूमिपूजनासाठी राज्यातील मान्यवर आणि मराठीतील  जेष्ठ साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या ऐरोली येथील उपकेंद्रासाठी मराठी भाषा विभागाने आवश्यक निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द केला आहे, तर मराठी भाषाभवन साठी लागणाऱ्या निधीची तरतूद झालेली आहे तसेच आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, आज उद्योगमंत्री सामंत यांनी ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच पुढील 15 दिवसांत काम सुरू करण्याची सूचना केली.

मराठी भाषा भवन मुख्य केंद्र गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंडावर उभे राहणार आहे. तर, उपकेंद्र एरोली नवी मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे, या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून लवकरच  कामाला सुरुवात होईल, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.

***

अर्चना शंभरकर/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.