पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0 10

मुंबई दि 21:- देशात आणि राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण असून महाराष्ट्र राज्यातही इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर ऊर्जा तसेच पर्यायी ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात वाढ होत आहे. उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात येत असल्याने महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये गुंतवणूक वाढीसाठी ‘सीए’ समुदाय मोठा वाटा उचलू शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ICAI द्वारे आयोजित 21व्या जागतिक लेखापाल काँग्रेसचा समारोप समारंभ झाला. यावेळी जागतिक लेखापाल काँग्रेसच्या अध्यक्ष अस्मा रस्मौकी, ICAI चे अध्यक्ष देवाशीष मित्रा, सचिव जयकुमार बत्रा, उपाध्यक्ष अनिकेत तलाटी व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ICAI द्वारे आयोजित 21व्या जागतिक लेखापाल परिषदेचे आयोजन आपल्या देशात आणि विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करण्यात आले ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. “Building Trust Enabling Sustainability” या थीमवर यामध्ये व्यापक विचारमंथन झाले. या मंचाद्वारे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विषयांबाबतही उहापोह झाला. आकर्षित करणारा असा सीएचा हा अभ्यासक्रम असून लेखापालन क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सनदी लेखापालांनी देशातील करदात्यांना कर भरण्याचे महत्व पटवून देण्यावर भर द्यावा. अर्थव्यवस्थेला त्याव्दारे बळकटी देण्याचे कामच आपण करत असता असेही श्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यतेची, स्टार्ट अप्स, युनिकाॅर्नची राजधानी

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखापालांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. सीए केवळ उद्योगांना चालना देण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठीच नव्हे तर देशात गुंतवणूक आकर्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्योजकता वाढीसाठी मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, युनिकाॅर्न असे अनेक उपक्रम आणले. अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे गती मिळत असते. महाराष्ट्र राज्य आता नाविन्यतेची, स्टार्ट अप्स व युनिकाॅर्नची
राजधानी बनत आहे.
25 टक्क्यांहून अधिक स्टार्ट अप्स आणि युनिकाॅर्न राज्यातील आहेत. या सर्वांच्या योग्य अंमलबजावणीसाठीही सीएंना महत्त्वाची भूमिका बजावता येईल असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. देशात जीएसटी संकलनात राज्याचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यातील जीएसटी करसंकलनात वाढ झाली आहे. तसेच करदात्यांच्या तक्रारींचे निराकरणही त्वरित करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.
‘स्पीड आॅफ ट्रॅव्हल’ आणि ‘स्पीड आॅफ डेटा’ यावर अधिक भर देण्यात येत आहे.
शासनाने रस्ते, मेट्रो आणि दळणवळणांच्या इतर माध्यमांना बळकट करण्यात विशेष लक्ष दिले आहे. वेगाने विकास करताना महाराष्ट्रात पोषक औद्योगिक वातावरण निर्माण केले असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

जागतिक लेखापाल काँग्रेसच्या अध्यक्ष अस्मा रस्मौकी म्हणाल्या, ICAI द्वारे आयोजित 21व्या जागतिक लेखापाल काँग्रेसचे मुंबईत यशस्वी आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट आयोजनाने विविध देशांतील प्रतिनिधी भारावले. आजच्या बदलणा-या जगात प्रत्येकाने सतत अद्ययावत असले पाहिजे. लेखापाल क्षेत्रात विश्वासार्हता खूपच महत्वाची आहे. व्यवसायातील प्रत्येक घटकाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. दूरच्या भविष्याचा विचार करून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजे असेही रस्मौकी यांनी सांगितले.

 (वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्स (WCOA) दर चार वर्षांनी एकदा आयोजित केली जाते, ही “ऑलिम्पिक ऑफ द अकाउंटन्सी प्रोफेशन” म्हणून प्रसिद्ध आहे.

मुंबईत 21 व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्सच्या आयोजनाच्या निमित्ताने 100 हून अधिक देशांतील 9000 हून अधिक प्रतिनिधी भारतातील सर्वात मोठ्या अकाउंटिंग फेस्टिव्हलमध्ये एकत्र आले.

 इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (IFAC) च्या नेतृत्वाखाली व्यावसायिक अकाउंटंट्सची सर्वात प्रतिष्ठित जागतिक स्पर्धा आहे. IFAC ही अकाउंटन्सी व्यवसायाची जागतिक संस्था आहे ज्यामध्ये 135 देश आणि अधिकारक्षेत्रातील सदस्य आणि सहयोगी म्हणून 180 संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.