‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
येत्या काळात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना
अहमदनगर दि. 19 नाव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा):- ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार असून रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळेल. असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी बांधलेला अहमदनगर शहरातील ३ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महापौर सौ. रोहिणी शेंडगे, खासदार सदाशिवराव लोखंडे, डॉ.सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, राम शिंदे, संग्राम जगताप, मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.
श्री.गडकरी म्हणाले, मुंबई ते दिल्ली पासून बांधण्यात येणाऱ्या ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’मुळे पुढील काळात अहमदनगर देशाच्या नकाशावर येणार आहे. सुरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्गे चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ ची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १४१ किलोमीटर आहे. ८० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात जेथे शक्य असेल तेथे लॉजिस्टिक पार्क उभारणे शक्य आहे. त्यामूळे नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. एक्सीस कंट्रोलने हा महामार्ग बांधत आहोत. सध्या याची लांबी १६०० किलोमीटर आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल अंतर आणि प्रदूषणही कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यायाने अहमदनगर साठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास श्री.गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, अहमदनगर उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी पाठपुरावा केला त्यानंतर युटीलिटी शिफ्टिंग, लष्करी परवानग्यांसाठी खासदार डॉ.सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले.
नवीन पुणे – औरंगाबाद महामार्गाचे काम येत्या काळात केले जाईल. सध्याच्याा पुणे-अहमदनगर मार्गावर वाघोली शिक्रापूर, रांजणगांव एमआयडीसी, शिरुर या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते ती टाळण्यासाठी रामवाडी -वाघोली ते शिरूर दरम्यान 56 किलोमीटरचा महामार्ग उपलब्ध होणार आहे. यातून वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.
शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. साखर कारखानादारांनी आता अधिक साखर उत्पादन न घेता इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळले पाहिजे. असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
उड्डाणपुलाच्या खांबावरील शिवचरित्राच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचे काम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. श्री. फडणवीस म्हणाले, विकासाची विविध कामे करत असताना वैविध्यपूर्णरितीने संस्कृती, परंपरा व इतिहास जपला असेल तर त्यासारखी दुसरी आनंदाची बाब नसते. या उड्डाणपुलाचे काम करतांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उड्डाणपुलाच्या ८५ खांबांवर शिवचरित्र चित्ररूपात साकारण्याची संकल्पना मांडली. यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यातील ३५ खांबांवर शिवचरित्र साकारण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणखी १७ हजार कोटीची कामे रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून प्रस्तावित केली आहेत. राज्य शासन सुद्धा पायाभूत सुविधांसाठी कामे करत आहे. भविष्यात निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.
सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा सोहळा – महसूलमंत्री विखे-पाटील
यावेळी महसूल मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, या उड्डाणपुलाच्या उभारणीत दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी, दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याबरोबर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर महानगरपालिकेला या ‘युटिलिटी कॉम्प्लेक्स’ उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून ५० कोटी रुपये दिले होते. त्यामुळे त्यांचेही या उड्डाणपुलाच्या उभारणीत अमूल्य योगदान आहे. खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा आजचा लोकार्पण सोहळा आहे, असेही श्री.विखे-पाटील यांनी सांगितले.
000000