ठाणे, दि.१३(जिमाका) :- संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने ११ व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघुले, पूर्वेष सरनाईक, सुप्रसिद्ध गायक मिका सिंग उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावो, हीच सदिच्छा.
प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
ते म्हणाले, तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचाविण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदनही केले.