जळगावमधील पत्रकारांच्या ‘नव्या गृहनिर्माण सोसायटी’साठी मदत करणार – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

जळगाव, दि. ०६ (जिमाका): पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो. अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगावमधील पत्रकारांसाठी नवी गृहनिर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आयोजित दर्पणदिनानिमित्त दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रमात बोलत होते.जिल्हा नियोजन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आमदार सुरेश भोळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रवीण सपकाळे, सचिन गोसावी, प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे, डीआयजी दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रिंट मिडियाचे पत्रकार चंद्रशेखर जोशी, सुनील पाटील, सुधाकर जाधव, चेतन साखरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किशोर,संजय महाजन, विजय वाघमारे, डिजिटल मीडियाचे नरेंद्र पाटील, निलेश पाटील, छायाचित्रकार सचिन पाटील यांना दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माध्यमात जशी बातमीसाठी स्पर्धा असते तशी स्पर्धा आमच्या क्षेत्रातही झाली आहे अशी मिश्किल टिप्पणी करून पत्रकारांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्याचा आमचा प्रयत्न असून पत्रकारांसाठी जळगावमध्ये नवी गृहनिर्माण सोसायटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले. पत्रकार दिनानिमित्त सर्व माध्यम प्रतिनिंधीना यावेळी शुभेच्छा दिल्या.

पत्रकारांचे स्थान समाजात खूप मोठे असल्याचे सांगून ते स्थान कायम राहिलं पाहिजे. तुम्ही माध्यमात कामं करणारी बुद्धीजीवी लोकं आहात त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या हातून होते. हे सगळे करतांना तुमचे आरोग्यही तेवढेचं महत्त्वाचे असून त्यासाठी सर्व पत्रकारांनी आरोग्य विमा उतरवावा, असा महत्वाचा सल्ला सुरेश भोळे यांनी यावेळी दिला.

पोलिसांचे आणि पत्रकारांचे संबंध रोजचेच असतात. पत्रकार म्हणून तुम्हीच तुमचे कर्तव्य बजावता, पोलीस म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. पत्रकारिता करतांना चुका दाखविणे हे तुमचे काम आहे ते करत रहा. फक्त्त कोणी तुमच्या पत्रकारितेमुळे नाउमेद होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे  यांनी केले.

तर जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी होण्यापूर्वी माझ्या जीवनाची सुरुवात ही पत्रकारितेतून झाली असून आकाशवाणी मध्येही मी काम केलेले आहेत. पत्रकारितेमध्ये पहिली गोष्ट शिकलो ती म्हणजे कोणत्या गोष्टीची बातमी  करायला पाहिजे आणि कोणती बातमी करायला नको. चार जणांची बातमी वाचून बातमी करणे म्हणजे तिला इंटेलिजन्स काम केले असे म्हणत नाही तर  फिल्ड पत्रकरितेवर जोर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जळगावच्या पत्रकारांचे कौतुक करताना म्हणाले की,  “ मी आजपर्यंत ज्या ज्या भागात नोकरी केली त्या भागातील पत्रकारांपेक्षाही जळगावच्या पत्रकारांच्या बातमीचा वेग अधिक आहे. माझ्या टेबलवर एखाद्या फाईलवर सही झाल्यानंतर एका तासात ती बातमी बाहेर येते. हेल्मेट वाटपाचा निर्णय अत्यंत स्तुत्य असून जळगावमध्ये दरवर्षी 500 अपघात होऊन लोकं दगावतात त्यापैकी 400 जण दुचाकीवरचे असतात. या हेल्मेटमुळे त्यांचे प्राण वाचतील,  याबाबत पोलिसांकडून जागृती केली जातेच आहे. यात पत्रकार संघाने पुढाकार घेतला असल्यामुळे या जागृतीला वेग येईल असे प्रतिपादन डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, पत्रकारांच्या बातमीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असावा, त्याच्यासाठी तुमची पत्रकरिता असावी. शासन, प्रशासन जिथे चुकते तिथे त्यांची चुक दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगून येथून पुढे एआय हे तंत्र आणि माणूस म्हणून आपण पत्रकार अशी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे योग्य कंटेट तुमच्याकडे असणं आता गरजेचं असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दर्पण हा वारसा फार मोठा आहे. मात्र तो वारसा विसरता कामा नये त्या दृष्टीने आपण काम करत राहिले पाहिजे. जगात काहीही बंद पडेल पण मुद्रित माध्यम बंद पडणार नाही. आजही  लोकांचा मुद्रित माध्यमावर लोकांचा विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री. आवटे यांनी केले.

०००

Source link