देशाच्या आर्थिक विकासयात्रेत जैन समाजाचे अनन्यसाधारण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




नागपूर, दि. ०५: अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार जैन समाज करतो. या सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात जैन समाजाचा मोठा वाटा असून भारताच्या आर्थिक विकासयात्रेतही अनन्यसाधारण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नागपूर विभागाच्या नवीन व्यवस्थापन समिती, महिला आणि युवा शाखेची स्थापना आणि शपथविधी सोहळा सूर्या नगर येथील नैवेद्यम इस्टोरिया येथे पार पडला त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी खासदार अजय संचेती, जितो शिखर संघटनेचे अध्यक्ष विजय भंडारी, महासचिव ललीत डांगी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, जितो या संघटनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच समाजसेवेचे कामही केले जाते. गरजूंपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम जैन संघटनेच्या माध्यमातून होत असते. भगवान महावीर यांनी आपल्याला सर्वसमावेशक विचार करण्याची शिकवण दिली आहे. हीच शिकवण आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वेल्थ, नोकरी आणि संधी निर्माण करणे यापेक्षा मोठी देशभक्ती नाही. आज आपण पाचवी अर्थव्यवस्था झालो आहे. तीन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढायचे असल्यास त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जगातील विकसित देशांकडे पाहिल्यास त्यांच्या विकासात महिलांचेही योगदान लक्षणीय असल्याचे पहावयास मिळते. एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के हिस्सा असणारा महिला वर्ग हा अर्थव्यवस्थेचा भाग होण्याची गरज आहे. भारतालाही विकसित अर्थव्यवस्था म्हणून 2047 पर्यंत पुढे यायचे असल्यास महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

०००







Source link