बंदरांची कामे दर्जेदार व कालमर्यादेत पूर्ण करावीत – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे – महासंवाद

मुंबई,दि.2 : महाराष्ट्र सागरी  मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बंदरांची कामे दर्जेदार,  गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी दक्ष रहावे, गुणवत्तेत तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी मंडळ येथे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाची आढावा बैठक झाली. पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचाही श्री. राणे यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी वाढवण बंदराच्या कामासंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले, महाराष्ट्र सागरी मंडळ ही महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लहान बंदरांच्या विकासासाठीची शिखर संस्था आहे.राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून या बंदरांचा विकास होणे अपेक्षित आहे.बंदरांचा विकास करतांना पारदर्शकता असावी.महाराष्ट्र राज्यातील लघु आणि मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिनाभरात काही बंदरांचे उद्घाटन व काहींचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. कामांमध्ये त्रुटी असतील तर तातडीने पूर्ण कराव्यात. विविध उपक्रम राबविण्यासाठी धोरण ठरविण्यात येईल. रेडिओ क्लबचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही मंत्री श्री. राणे म्हणाले.

मत्स्यव्यवसाय विभागाने महसूल निर्मिती आणि उत्पादन याबाबत प्रभावी अंमलबजावणी करावी

१०० दिवसांचा आराखडा तयार करताना मत्स्यव्यवसाय विभागाने जास्तीत जास्त महसूल निर्मितीसाठी प्रयत्न करावे. तसेच उत्पादन वाढीसाठीही प्रभावी अंमलबजावणी करावी. मत्स्यव्यवसाय विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. काही देशांचे 90 टक्के महसूल मत्स्यव्यवसायातून मिळतो. त्या धर्तीवर आपल्या राज्याचाही महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळून महसूल निर्मितीसही चालना मिळेल. मुंबई शहरात विविध भागांमध्ये मत्स्यालय उभारणी करावी, त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून पर्यटन व्यवसाय वाढेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, मा.मु.का.अ.माणिक गुरसाळ, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, मुख्य अभियंता राजाराम गोसावी, वित्तीय नियंत्रक नि. मुख्य लेखाधिकारी सुरेश सारंगकर मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळ पंकज कुमार, सहायुक्त युवराज चौगुले, अभय देशपांडे, महेश देवरे, उपायुक्त श्रीमती हृता दीक्षित, योगेश देसाई, कार्यकारी अभियंता  ललिता गौरी गिरीबुवा, सहाय्यक संचालक लक्ष्मण धुळेकर, सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील, सुभाष भोंबे  हे देखील उपस्थित होते.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

Source link