मुंबई, दि. 26 :- सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक सहभागी झाला पाहिजे, या दृष्टीने सहकार विभागाने सुयोग्य नियोजन करावे व त्यानुसर कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दीपक तावरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्याला सहकार चळवळीचा मोठा वारसा आहे. या चळवळीत अनेक महनीय व्यक्तींचे योगदान राहिले आहे. या व्यक्तींनी राज्यात सहकार चळवळ रुजवली, वाढवली आहे. सहकार चळवळीमुळे राज्याची प्रगती झाली. सहकारी साखर कारखाने, नागरी बँका, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, पतपुरवठा संस्था यामुळे शहरी व ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली. सहकार चळवळीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे. सहकार चळवळीत शेवटचा घटक सामील व्हावा, असे प्रयत्न सहकार विभागाने करावेत.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सहकरामध्ये चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. देशात सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करून या क्षेत्रात राज्याचे वेगळेपण सिद्ध करून एक वेगळा ठसा उमटविण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे, असे आवाहन सहकार मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.
आढावा बैठकीत सहकार विभाग, साखर आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, उपक्रम व कामकाजाची माहिती सादर करण्यात आली.
००००
एकनाथ पोवार/विसंअ