- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती
- राज्यातील ३० जिल्ह्यात सूमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ
- नावावर जमीन झाल्याने बँकातील पतही उंचावणार
नागपूर,दि. 25 : राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठानात आपल्या वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायीक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यातील सुमारे 30 हजार 515 गावांमधील जनतेच्या आयुष्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग देणाऱ्या स्वामीत्व योजनेचा महाशुभारंभ राज्यातील 30 जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या 27 तारखेला होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील 30 जिल्ह्यांच्या ठिकाणी हा महाशुभारंभ होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती राहील. या मालमत्ता कार्डाच्या महावाटप शुभारंभास प्रधानमंत्री मोदी यांचे प्रमुख मार्गदर्शन असल्याचे म्हणाले.
अनेक गावात जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद-विवाद होतात. जमिनीच्या कागदपत्रांबद्दल अनेकांना परिपूर्ण माहिती नसते. काही गावात इतरांच्या जमिनीवर कब्जा सारखे प्रकार होतो. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासह अधिक पारदर्शकतेच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
येत्या २७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता नागपूरसह राज्यातील ३० जिल्ह्यांच्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीमुळे गावकर्यांना हक्काचे मालमत्ता कार्ड प्राप्त होईल. घरकर्जासारखी सुविधा मिळण्यासाठी हे मालमत्ता कार्ड महत्त्वाचा दस्तऐवज राहील. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना घरासाठी, तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील जमिनीचे योग्य पद्धतीने मोजमाप झाल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणार्या कराची आकारणी उत्तम प्रकारे मिळणार आहे. तसेच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढणार आहे. यामुळे गावातील विकास कामांना गती मिळेल असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
००००