उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाची आढावा बैठक संपन्न – महासंवाद

पुणे, दि. २४: उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पिंपरी चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह उद्योग संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, तळवडे आदी ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील उद्योगांच्या समस्यांचा आढावा मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, पीएमआरडीए च्या माण – म्हाळुंगे टी. पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणार असल्याने हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकातील टपऱ्या पोलीस विभागाच्या सहकार्याने हटवाव्यात. उद्योगांनी त्यांच्याकडील वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी. एमआयडीसीने दोन्ही महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मोकळ्या जागा शोधून तेथे उद्योगांसाठी येणाऱ्या ट्रक आदी वाहनांचे पार्किंगसाठी प्रयत्न करावेत.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे, दुभाजक, पदपथ आदींची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. सुविधांसाठी उद्योगांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क उद्योगांना परवडेल अशा पद्धतीने त्यांचेशी समन्वय साधून वाढविण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी. तसेच वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल. तळवडे माहिती तंत्रज्ञान पार्क येथील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पोलीस विभाग, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एनएचएआय, जिल्हा परिषद आदी सर्व संबंधित विभागांनी उद्योगांच्या समस्या समन्वयाने सोडवाव्यात.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. 3 येथील पोलीस चौकीसाठी आवश्यक त्या जागेचा ताबा पोलीस विभागास देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही प्रकल्प, लक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी पाण्याची वाहिनी तसेच बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम आदींच्या अनुषंगाने विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली.

0000

Source link